बदलापूर महानगरपालिका करणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 August 2024

बदलापूर महानगरपालिका करणार - मुख्यमंत्री


ठाणे - आज बदलापूर बदलत आहे. लोक बदलापूरला पसंत करु लागले आहेत. बदलापूरला राहायला यायला लागले आहेत. येथील नागरिकांची लोकभावना येथे महानगरपालिका  करावी, अशी असेल तर तसा निश्चितपणे विचार करण्यात येईल. नागरिकांचा आवाज ऐकणार हे सरकार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बदलापूर येथे केले.
            
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या उर्दू शाळा क्र. ०२ व कुळगाव बदलापूर नगर परिषद नवीन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
            
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे, आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कुळगाव बदलापूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड, विविध विभागाचे प्रशासकीय  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
            
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कुळगाव बदलापूर नगर परिषदेची  ही इमारत भव्य दिव्य आहे. या इमारतीसाठी मी मुख्यमंत्री असल्याने 25 कोटी रुपये देऊ शकलो. शेती व पायाभूत सुविधामध्ये आपण चांगले काम केले आहे. जे प्रकल्प बंद होते ते आपण सुरू केले. कारण देशामध्ये सर्वात जास्त पायाभूत सुविधा आपल्या महाराष्ट्रात आहेत. परदेशी गुंतवणूकीमध्ये आपला पहिला नंबर आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे. त्याला मदत करताना हात आखडता घेतला नाही. हे सरकार शेतकरी बांधवाच्या पाठीशी उभे आहे.
           
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनच्या अगोदर दोन दिवस त्यांच्या बॅंक खात्यात जमा होतील, असा शब्द दिला होता. राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा केले आहेत. ज्यांच्या अर्जात त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करुन घेऊ. दि. 31 ऑगस्ट नंतर जरी अर्ज आले तरीही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे पैसे देणार आहोत. हे राज्य शासन सरकार बहिणीच्या खात्यात पैसे भरणारे आहे. आपण वेगाने निर्णय घेतले आहेत. महिलांसाठी तब्बल 107 निर्णय आपण घेतले, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
आपल्या राज्यात उद्योग येत आहेत.त्यांना मनुष्यबळ उपलब्ध करुन देत आहोत. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजेनमधून 547 तरुणांना ठाणे महानगरपालिकेने नियुक्तीपत्र दिले आहेत.तसेच कुळगाव बदलापूर नगरपरिषदेमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार द्या. उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण दिले आहे.मुलींना यापुढे कोणतेही शिक्षणासाठी पैसे भरावे लागणार नाहीत. शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरु केली आहे. जेष्ठांना मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु करण्यात आली आहे. या योजना सर्व चालू राहणार आहेत. जे आपणास आवश्यक आहे, ते आपणास देण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad