नवी दिल्ली - काही महिन्यांपूर्वी भारतीय संसदेचे काम नव्या इमारतीमध्ये स्थानांतरीत करण्यात आले आहे. मोठ्या थाटामाटात नव्या संसदेचे उद्घाटन झाले. पण, याच नव्या संसदेच्या इमारतीला गळती लागल्याचे आता समोर आले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली.
मणिकम टागोर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलंय की, संसदेच्या बाहेर पेपर लीक होत आहेत आणि संसदेमध्ये पाणी लीक होत आहे. राष्ट्रपती वापरत असलेल्या संसदेच्या लॉबीमध्ये पाणी गळती होत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. नवी इमारत बांधून नुकतेच एक वर्षे झाले आहे. त्यामुळे हा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित करणार आहे.
भारताच्या नव्या संसदेचे उद्घाटन २८ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. जुन्या संसदेचे उद्घाटन १८ जानेवारी १९२७ साली करण्यात आले होते. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज याच जुन्या इमारतीमध्ये सुरु होते. पण, पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी नव्या इमारत बांधणीचा प्रकल्प हाती घेतला होता.
नव्या संसदेमध्ये गळती सुरु झाली असल्याने विरोधकांना टीकेसाठी ही चांगलीच संधी मिळाली आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष एनडीए सरकारला धारेवर धरु शकतात. त्यामुळे भाजप यावर काय पवित्रा घेतं हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्लीला पावसाचा रेल अलर्ट जारी करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment