ईद-ए-मिलादनिमित्त १६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुटी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2024

ईद-ए-मिलादनिमित्त १६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुटी


मुंबई - ईद-ए-मिलाद सणानिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सोमवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी पूर्वी घोषित केलेली ईद-ए-मिलाद सणाची सार्वजनिक सुटी महाराष्ट्र शासनाकडून रद्द करण्यात आली आहे. त्या ऐवजी बुधवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२४ या दिवशी ईद-ए-मिलाद सणानिमित्त सार्वजनिक सुटी शासनाने जाहीर केली आहे. अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद या दोन्ही दिवशी निघणाऱ्या मिरवणूक सामाजिक सलोखा कायम राहून पार पाडाव्यात, या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.

सार्वजनिक सुटीतील हा बदल महाराष्ट्र शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करून जाहीर केला आहे. त्याआधारे, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने देखील ईद-ए-मिलाद सणानिमित्त सोमवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजीची सुटी रद्द करून त्याऐवजी बुधवार, दिनांक १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. सबब, सुटीतील या बदलामुळे आता सोमवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व कार्यालये नियमितपणे सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे, सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील.

ईद-ए-मिलाद सणानिमित्त, बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी, मुंबई महानगरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व कार्यालये, तसेच ठाणे जिल्ह्यातील बृहन्मुंबई महानगरपालिकेची कार्यालये यांना (सफाई, रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहे, जलकामे, विद्युत धुलाई केंद्र, अग्निशमन, उदंचन केंद्र, सुरक्षा, देवनार पशुवधगृह, आपत्कालीन व्यवस्थापन या अत्यावश्यक सेवा वगळून) सार्वजनिक सुटी राहील, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad