
मुंबई - मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारा बेस्ट उपक्रम गेले काही वर्षे आर्थिक संकटात आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पालिकेने वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे. यंदाही पालिकेकडून बेस्ट उपक्रमाला 1 हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
मुंबई महापालिकेचा सन 2025-26 चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांना सादर करण्यात आला. यात बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सन २०१२-१३ पासून जानेवारी २०२५ पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमास एकूण ₹११३०४.५९ कोटी इतक्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे. सध्याचे हाती घेतलेले प्रकल्प आणि इतर महत्वाच्या उद्दिष्टांकरिता स्वतः बृहन्मुंबई महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असतानादेखील, बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ₹१००० कोटी इतकी तरतूद अनुदान म्हणून प्रस्ताविण्यात आली आहे.
सदर रक्कम बेस्ट उपक्रमास पायाभूत सुविधांचा विकास आणि भांडवली उपकरणांची खरेदी, कर्जाची परतफेड, भाडेतत्वावरील (Wet Lease) नवीन बसेस, वेतन करारान्वये येणारे आर्थिक दायित्व, दैनंदिन खर्च, ITMS प्रकल्प, कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान, निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान व इतर विविध देणी, विद्युत देणी, इत्यादी तसेच राज्य शासनाच्या निर्देशांनुसार मुंबई शहरासाठी बेस्ट उपक्रमाच्या २,००० इलेक्ट्रीक बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यासाठीच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ५ टक्के हिस्सा म्हणजेच १२८.६५ कोटी रुपये या खर्चापोटी प्रदान करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे, विद्युत बसगाड्या खरेदी करण्याकरिता १५ व्या वित्त आयोगाकडून १९९२ कोटी इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी, प्राप्त झालेली १४९३.३८ कोटी इतकी रक्कम बेस्ट उपक्रमास अधिदानीत करण्यात आली आहे व उर्वरीत ₹४९८.६२ कोटी इतकी रक्कम १५ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झाल्यानंतर बेस्ट उपक्रमास उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment