
मुंबई - मर्चंट नेव्हीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, त्याचा मृतदेह ससून डॉकजवळ समुद्रात आढळला आहे. सुनील पाचार असे या तरुणाचे नाव आहे. तो २३ वर्षांचा होता. सुनील पाचारचा मृतदेह सापडल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठवला आहे. रुग्णालयातून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेता येईल, असे पोलिसांनी सांगितले.
मूळचा राजस्थानमधील शिखर येथील निवासी असलेला सुनील पाचार मर्चंट नेव्हीत होता. तो एका मालवाहक जहाजावर कार्यरत होता. या मालवाहक जहाजाचे मुख्य प्रभारी देबाशीष मोंडल यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात सुनील पाचारच्या मृत्यू चुकून पाण्यात पडल्यामुळे झाल्याचे नमूद आहे. सुनील आणि आणखी एक नाविक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी ड्रायव्हिंग डेकवर आराम करत होते. दुसरा नाविक चहा बनवायला गेला असताना सुनीलला जाग आली. सुनील अर्धवट झोपेत लघवीसाठी गेला आणि तोल जाऊन किंवा पाय घसरुन पाण्यात पडला; अशा स्वरुपाचे निवेदन देबाशीष मोंडल यांनी पोलिसांना दिले. मात्र सुनीलच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.
सुनीलचा चुलत भाऊ रमेश मुंड यांनी संशय व्यक्त केला आहे. सुनीलकडून मिळालेल्या माहितीआधारेच त्यांनी हा संशय व्यक्त केला आहे. जहाजावर सुनीलचा सचिन नावाच्या सहकारी नाविकाशी गर्लफ्रेण्डवरुन वाद झाला होता. या वादानंतर सुनील बेपत्ता झाल्याचे रमेशने सांगितले. सुनील पाचार ज्या जहाजावरुन बेपत्ता झाल्याचे सांगत होते त्या जहाजावर तो नोव्हेंबर २०२४ पासून काम करत होता; अशीही माहिती त्याच्या घरच्यांनी दिली.
सुनील पाचार ३ फेब्रुवारी २०२५ पासून मालवाहक जहाजावरुन बेपत्ता होता. त्याची सगळीकडे शोधाशोध करण्यात आली मात्र तो सापडला नाही. त्यानंतर ४ फेब्रुवारी २०२५ रोजी यलो गेट पोलीस ठाण्यात सुनील हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी दीडच्या सुमारास ससून डॉकजवळ समुद्रात सुनीलचा मृतदेह आढळला.
No comments:
Post a Comment