महायुतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 February 2025

महायुतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस


मुंबई - विधानसभा निवडणुकीत स्पष्ट जनादेश मिळाल्याने पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. महायुती अभेद्य आहे आमच्यात कोणताही वाद नाही असे सांगितले जात असले तरी दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून धुसफूस सुरू आहे. त्यामुळे सातत्याने वाद चव्हाट्यावर येत आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर मंत्रिमंडळाचे वाटप, खातेवाटप आणि पालकमंत्री पदाचेही वाटप करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून महायुतीत वाद रंगला. अद्यापही रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. आता शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) ९० टक्के कार्यकर्त्यांनी निवडणुकीत योगेश कदम यांचे काम केले नाही, असा आरोप केला. यावरून राष्ट्रवादी आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडल्याची चर्चा रंगली.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. त्याला उत्तर देताना भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी ते भाजपाच्या पायगुणामुळे मंत्री झाले. जर भाजपाचे सरकार आले नसते ते ते मंत्री झाले असते का, याचे भान त्यांनी ठेवावे असा सल्ला दरेकर यांनी दिला. त्यातच खा. अशोक चव्हाण यांच्यावर शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी टीका करताना अशोक चव्हाण म्हणजे भाजप नव्हे, असे म्हटले आहे. त्यामुळे नांदेडमध्येही शिवसेना-भाजपमध्ये वाद वाढला आहे.

एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर संपलेली आहे. २०२४ नंतर सुद्धा आपण मुख्यमंत्री राहणार असे वचन एकनाथ शिंदे यांना दिले होते. परंतू ते पाळले गेले नाही आणि त्यांना खड्यासारखे बाजूला काढले आहे. त्यामुळे त्यांचा चेहरा पाहीला तर ते अजूनही गुंगीत किंवा धक्क्यात आहेत असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. यावर प्रतिक्रीया देताना दरेकर म्हणाले की संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची जास्तच काळजी वाटते. संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांची वकिली कधीपासून करू लागले? उद्धव ठाकरे यांची काळजी घेण्याऐवजी ते आता शिंदे यांची काळजी घ्यायला लागले आहेत. निष्ठा नक्की कोणाकडे आहे? एकेकाळी त्यांची निष्ठा शरद पवारांकडे होती. आता ‘‘त्याची टोपी ह्याला, ह्याची टोपी त्याला’’ असा खेळ सुरू केला आहे. संजय राऊत यांनी फुटकळ बोलणं बंद करावं. आमच्यात सगळं काही आलबेल, तुमचं तुम्ही पाहाङ्घ शिंदेंची काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्र आहोत असे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad