मुंबई - गेले काही आठवडे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे प्रत्येक घरात एक किंवा दोन नागरिक आजारी आहेत. त्यात लहान मुलं सर्दी, खोकला यामुळे खूपच आजारी आहेत. सरकारी इस्पितळांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. याची दखल घेवून मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी वाढत्या प्रदूषणावर दीर्घकालीन उपायोजना कराव्यात अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांना लिहिलेल्या पत्रात रवी राजा म्हटले आहे की, मुंबईला हवेच्या प्रदूषणचा फटका गेले काही वर्ष बसत आहे. पण त्यासाठी एक स्टैंडर्ड ऑपरेशन प्रोसिजर (SOP) जरी महापालिकेने केली असली तरी तितकं पुरेसं नाही. ही SOP च्या अंमलबजावणीकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. सध्या महापालिकेत जसं शिक्षण आणि आरोग्य असे वेगळे विभाग आहेत, असा पर्यावरणासाठी एक वेगळा विभाग करायला हवा, आणि त्या विभागाला एक वेगळे बजेट देखील देणं आवश्यक आहे. ज्यामुळे मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा सामना करता येईल.
रवी राजा यांनी पुढे पत्रात म्हटले आहे की, प्रदूषणाचा सामना करण्यासाठी वॉर्ड पातळीवर, त्या वॉर्डातील गरजांप्रमाणे प्रशासकीय उपाय योजले पाहिजेत. त्यासाठी प्रशासकीय आराखडा देखील बनवला पाहिजे. आयआयटीसारख्या नामांकित संस्थांना एकत्र करून एक कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे. दरवर्षी महापालिका नोव्हेंबर महिन्यात प्रदूषणाची पातळी वाढायला लागली की जागी होते आणि पुन्हा फेब्रुवारीनंतर हा विषय विसरला जातो. यामुळे प्रदूषणावर कधीच कायमस्वरूपी तोडगा निघणार नाही. प्रदूषण हा विषय वर्षभर महापालिका प्रशासनाच्या अजेंड्यावर असायला हवा.
No comments:
Post a Comment