
मुंबई - केईएम रुग्णालयामध्ये संशयित कोरोना बाधित असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळं झाल्याचं केईएम रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तर, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं म्हटलं आहे.
केईएम रुग्णालयात 58 वर्षीय महिलेचा आणि 13 वर्षीय मुलीचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याचं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे. रुग्णालय प्रशासनानं दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसून त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाला असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे 58 वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि 13 वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, दोन्ही रुग्णांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या चाचणीमध्ये हे रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये देखील वाढली आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संंख्या मे महिन्यात पहिल्या आठवड्यात 28 टक्क्यांनी वाढली आहे. तर, रुग्णसंख्या 14200 वर पोहोचली आहे. भारतातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 इतकी आहे. तर, 28 एप्रिलनंतर वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 58 इतकी आहे. 5 मेनंतर बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 42 इतकी आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 12 इतकी आहे. 28 एप्रिलनंतर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 7 इतकी नोंदवली गेली आहे. तर, 5 मेनंतर करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 5 इतकी आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी मध्ये आहे.
No comments:
Post a Comment