यासंदर्भात आमदार रईस शेख म्हणाले की, नागपुरातील जरीपटका भागात ‘दयानंद आर्य कन्या विद्यालय’ आहे. आश्चर्य म्हणजे ही शाळा अल्पसंख्याक गटातील आहे. नागपुरात नुकतीच धार्मिक दंगल झाली होती. त्या पार्श्वभूमीवर या अल्पसंख्याक शाळेने मुस्लीम विद्यार्थींना प्रवेश न देण्याचे धोरण अवलंबले होते. शाळा सचिवांनी विद्यालयातील शिक्षकांना तसे तोंडी आदेश दिले होते. त्यामुळे मुस्लीम विद्यार्थींनींचे प्रवेश अर्ज जागा असूनही प्रलंबित ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
या प्रकरणी संबंधित पालकांनी जरीपटका पोलीस ठाण्यात आणी राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दिली आहे. शाळा सचिव राजेश लालवानी व शिक्षिका सिमरन ज्ञानचंदानी यांच्यावर भा.न्या.सं. कलम २९९ नुसार धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. हा प्रकार गंभीर असून या शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असा प्रकार राज्यात इतरत्र होवू नये, यासाठी सर्व शाळांना सक्त ताकीद देण्यात यावी. अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.
कश्मीरमध्ये पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणानंतर हिंदू आणि मुस्लीम भारतीय नागरिकांनी एकजुटीचे दर्शन दाखवले होते. देशात धार्मिक सामंजस्य व एकात्मतेची वातावरण निर्मिती होत असताना नागपूरमध्ये मुस्लीम विद्यार्थींनी संदर्भात घडलेली घटना निंदनीय आहे. महिला व बालविकास, शालेय शिक्षण तसेच अल्पसंख्याक विभागाने याप्रकरणी कठोर कारवाई करणे अभिप्रेत असल्याचे आमदार रईस शेख यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment