बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाचे’ ३ दरवाजे दिनांक ७ जुलै २०२५ रोजी उघडण्यात आले आहेत. तर, दिनांक ९ जुलै २०२५ रोजी मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला होता. त्यापाठोपाठ आज तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे.
मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ८६.८८ टक्के इतका जलसाठा आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण असून हे सर्वात जुन्या दगडी बांधांपैकी एक मानले जाते. आज ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही १४,५०८ कोटी लीटर (१४५,०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे. तानसा तलाव गतवर्षी दिनांक २४ जुलै २०२४ रोजी पहाटे ४.१६ वाजता, दिनांक २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर वर्ष २०२२ मध्ये दिनांक १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि सन २०२१ मध्ये दिनांक २२ जुलै रोजी पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता.

No comments:
Post a Comment