
मुंबई - नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या (Lalbagcha Raja) विसर्जन मिरवणुकीला दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गर्दीचा नवा उच्चांक नोंदवला गेला. मात्र, या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी १०० हून अधिक मोबाईल आणि सोन्याच्या वस्तू लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १६ आरोपींना अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीच्या मिरवणुकीत मोबाईल फोन चोरीच्या १०० हून अधिक घटना घडल्या आहेत. काळाचौकी पोलिस ठाण्यात यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या असून, आतापर्यंत १० गुन्हे अधिकृतपणे नोंदवले गेले आहेत. चार गुन्ह्यांची उकल झाली असून, चोरीचे मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणांत ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय सोन्याच्या साखळ्यांच्या चोरीच्या घटनांचीही नोंद झालीय. पोलिसांनी आतापर्यंत दोन सोन्याच्या साखळ्या जप्त केल्या असून, या प्रकरणात तब्बल १२ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
३४ तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर विसर्जन -
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीनिमित्त लालबाग-परळ परिसर ढोल-ताशांच्या गजराने, भक्तिगीतांनी आणि रंगीबेरंगी सजावटीने गणेशमय झाला. मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेत भक्तिभावाने आरती, जयघोष आणि प्रार्थना केल्या. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीनं मुंबईच्या रस्त्यांवर एक अनोखा उत्साह निर्माण केला. लालबागच्या राजाचं यंदा तब्बल जवळपास ३४ तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर रविवारी रात्री ९.३० वाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालं.


No comments:
Post a Comment