
पुणे - शहरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. पुण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक जवळपास ३२ तासांपेक्षा अधिक वेळ चालली. मात्र, या सगळ्यादरम्यान, मिरवणुकीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या एका महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बुधवार चौक येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीदरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी एक नवोदित महिला पत्रकार वार्तांकन करत होती. त्या वेळी त्रिताल ढोल ताशा पथकातील दोन सदस्यांनी संबंधित महिला पत्रकारासोबत वाईट वर्तणूक केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाने या घटनेचा त्वरित पाठपुरावा केला. या प्रकरणी २० वर्षीय नवोदित महिला पत्रकाराने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तिच्या एका मित्रासोबत ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:१५ ते ७:४० वाजताच्या दरम्यान बुधवार चौक येथे मिरवणुकीचं वृत्तांकन करत होती. त्यावेळी त्रिताल ढोल ताशा पथकातील एका अनोळखी व्यक्तीनं तिच्या पायावर लोखंडी ट्रॉलीचा चाक तिच्या पायावरून घातला. तक्रारदारांनी त्याबाबत त्याला विचारणा केली असता, त्या व्यक्तीनं त्यांना धक्काबुक्की केली. तक्रारदाराच्या मनात लज्जा निर्माण होईल, अशाआक्षेपार्ह पद्धतीनं स्पर्श करून मागे ढकलले.
पत्रकाराच्या मित्रालाही मारहाण
या दरम्यान, पीडित पत्रकाराचा मित्र शोएब तडवी यांनी धक्काबुक्की करणा-याला याबाबत जाब विचारला. यावर ढोल पथकाच्या व्यक्तीनं तडवींना देखील जोरदार धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. या घटनेनंतर फरासखाना पोलीस ठाण्यात या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास फरासखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील करत आहेत.
रोहित पवारांकडून निषेध
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध करताना म्हटले आहे की, पोलिसांकडून आणि ढोल पथकातील कार्यकर्त्यांकडून पत्रकारांवर करण्यात आलेल्या मारहाण आणि गैरवर्तनाचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आणि कदापि समर्थनीय नाही. पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी पत्रकारांच्या संदर्भात अलिकडच्या काळात घडलेल्या तिन्ही घटनांची तातडीने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी माझी ठाम मागणी आहे.मुख्यमंत्री महोदयांनी या सर्व घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन याप्रकरणी त्वरीत आणि कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, ही अपेक्षा आहे.


No comments:
Post a Comment