
मुंबई (जेपीएन न्यूज) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी सर्व नागरी सुविधा आणि सेवांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यास बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.
महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका मुख्यालयात आज विशेष आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी गगराणी यांनी सर्व विभागांना सूचित केले की, कोणतीही कमतरता राहता कामा नये आणि सर्व सोयी-सुविधा वेळेत पूर्णत्वास याव्यात. तसेच “सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून कार्यवाही करावी आणि अनुयायांना सर्वोत्तम सेवा द्यावी,” अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहमहानगर आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांनी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात करण्यात येणाऱ्या तयारीबाबत माहिती दिली. यामध्ये चैत्यभूमी स्मारक परिसराचे सौंदर्यीकरण, तोरणा प्रवेशद्वार, अशोक स्तंभ, भीमज्योत सजावट, नियंत्रण कक्ष, वैद्यकीय सेवा, भोजन मंडप, पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, अग्निशमन दल व्यवस्था, धूळ प्रतिबंधक उपाय, माहिती फलक, मोबाइल चार्जिंग सुविधा अशा विविध सोयींचा समावेश आहे.
याशिवाय चैत्यभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन, पुष्पचक्र अर्पण, पुष्पवृष्टी आणि शासकीय मानवंदना यांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
या बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. भदंत राहूल बोधी-महाथेरो, यांच्यासह नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, गौतम सोनवणे, रमेश जाधव, प्रतीक कांबळे, आदींसह विविध बौद्ध संघटनांचे पदाधिकारी व मान्यवरही उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायांचा ओघ लक्षात घेता चैत्यभूमी परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment