नगर-मनमाड महामार्ग मृत्यूचा सापळा; रस्ता दुरुस्त न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नगर-मनमाड महामार्ग मृत्यूचा सापळा; रस्ता दुरुस्त न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा

Share This

शिर्डी / कोपरगाव (दिलीप गायकवाड) – अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून हा महामार्ग नागरिकांसाठी “मृत्यूचा सापळा” ठरत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघात होऊन निष्पाप लोकांचे प्राण जात आहेत. नुकत्याच घडलेल्या भीषण अपघातात कोपरगाव शहरातील होतकरू तरुण आदित्य देवकर (वय अंदाजे २५) याचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आदित्य देवकर आपल्या दुचाकीवरून कोपरगावच्या येवला नाका परिसरातून जात असताना बजाज शोरूमसमोर असलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी अडकल्याने तो रस्त्याच्या बाजूला पडला. त्याचवेळी अज्ञात वाहन त्याच्या अंगावरून गेले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेबाबत शिवसेना (उबाठा) चे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, “नगर–मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने रस्ता दिसत नाही. याशिवाय प्रकाशव्यवस्था नसल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासन आणि संबंधित बांधकाम विभाग याबाबत पूर्णपणे जबाबदार आहेत.”

झावरे यांनी पुढे चेतावणी दिली की, “जर तात्काळ रस्त्याची दुरुस्ती, खड्डे बुजवणे आणि योग्य प्रकाशव्यवस्था करण्यात आली नाही, तर शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उग्र आंदोलन करतील. या मृत्यूंसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.”

स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्येही या अपघातानंतर संतापाचे वातावरण असून, नगर–मनमाड महामार्गावर तातडीने सुधारणा कार्य सुरू करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages