
मुंबई - “कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षी जूनमध्ये कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करावे,” अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.
ठाकरे म्हणाले, “निसर्गाने कोप धरला आहे आणि त्यात संवेदनाशून्य सरकारचा तुघलकी कारभार सुरू आहे. अशा अस्मानी-सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने पुन्हा एकदा वेळकाढूपणा करून खेळवले आहे. कर्जमाफीसाठी समिती नेमण्याचा निर्णय म्हणजे फसवणुकीचा आणखी एक अध्याय आहे.”
ते पुढे म्हणाले, “शेतकरी आज उद्ध्वस्त झाला आहे. पावसामुळे जमिनी वाहून गेल्या, उत्पादन घटले, नुकसानभरपाई मिळाली नाही. सरकारने हजारो कोटींची घोषणा केली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम आली? आत्महत्यांचे आकडे वाढत असताना सरकार डोळेझाक करते आहे. अशा वेळी ‘योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ’ हा सरकारचा प्रतिसाद म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे.”
ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला की, “पुढील जूनमध्ये कर्जमाफी होणार असल्यास आत्ताचे कर्ज हप्ते भरायचे का? जर ते माफ होणार असतील तर शेतकऱ्यांना नवे कर्ज मिळणार का? आणि तेही माफ होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे कोण देणार?”
“शेतकऱ्यांना परदेशी अभ्यास समित्यांची गरज नाही, त्यांना तात्काळ दिलासा हवा आहे. सरकारने चालढकल करून शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ढकलले आहे. जूनपर्यंत होणाऱ्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का?” असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.
शेवटी ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्यांना खेळवणे थांबवा. अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्त करा. शेतकऱ्यांना गुळ दाखवून जूनपर्यंत थांबवण्याचा सरकारचा प्रयत्न अमानुष आहे.”

No comments:
Post a Comment