BMC Election - मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार नावे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2025

BMC Election - मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार नावे


मुंबई - मुंबई महापालिकेने 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत तब्बल 11 लाख 1 हजार 505 दुबार नावे असल्याचे उघड झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना मतदार यादीतील या मोठ्या घोळावर राजकीय पक्षांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे.

महानगरपालिकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार S-वॉर्डमध्ये सर्वाधिक 69,500 दुबार मतदार आढळले असून, B-वॉर्डमध्ये सर्वात कमी 8,398 दुबार नावे नोंद झाली आहेत. प्रारूप यादी जाहीर होताच शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि विरोधी पक्षांनी तक्रारींचा पाऊस पाडला होता. त्यानंतर महानगरपालिकेकडून वार्डनिहाय तपशील प्रसिद्ध करण्यात आला.

निवडणूक आयोगाने शेवटची मतदार यादी 30 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केली होती. नियमानुसार जानेवारीत नवी आणि दर तीन महिन्यांनी सुधारित यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित असतानाही, गेले 13 महिने यादी जाहीर झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

यादीतील लिंग, पत्ता यांसारखी महत्त्वाची माहिती अपूर्ण, तसेच यादी एडिटेबल स्वरूपात नसल्याने प्रत्यक्ष जमिनीवरील कामात अडचणी निर्माण झाल्याचे पक्षांचे म्हणणे आहे. “जग कृत्रिम बुद्धिमत्तेकडे जात असताना आयोगाच्या कामकाजात मूलभूत तांत्रिक तयारीही नाही,” अशी टीका ठाकरे गटाने केली.

दरम्यान, मतदार नोंदणी, वगळलेली नावे आणि बदल यासंबंधी आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या माहितीतही गोंधळ असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. “हे हेतुपुरस्सर केले का? नसेल तर इतका विलंब आणि त्रुटींचे कारण काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मतदार यादीतील या प्रचंड गोंधळामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS