
मुंबई - बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियनने १० नोव्हेंबर २०२५ पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या उपोषणाचे नेतृत्व संघटनेचे सरचिटणीस शशांक राव करतील. शशांक राव यांच्या संघटनेचे सदस्य मोठ्या प्रमाणात असल्याने बेस्टच्या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
संघटनेने सांगितले की, बेस्ट उपक्रमात सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची थकित रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही, तसेच कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगास अनुसरून असलेला वेतनकरार अद्याप प्रलंबित आहे.
संघटनेने इशारा दिला आहे की, प्रशासनाने त्वरित निर्णय घेतला नाही, तर मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प होऊ शकते. सध्या बेस्टकडे स्वमालकीच्या फक्त २५१ बसगाड्या उरल्या आहेत, तर करारानुसार ३,३३७ बसगाड्या कायम ठेवणे अपेक्षित होते. या परिस्थितीत मुंबईकरांना मिळणारी अत्यावश्यक वाहतूक सेवा धोक्यात आली असल्याचे राव यांनी सांगितले.
‘मुंबईची जीवनवाहिनी’ धोक्यात -
संघटनेच्या म्हणण्यानुसार, बेस्टची बससेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. परंतु आर्थिक अडचणींमुळे स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्या झपाट्याने घटली असून, ही सेवा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
“मुंबईकर जनतेच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आम्ही लढा देत राहू,” असे शशांक राव यांनी स्पष्ट केले.
मुख्य मागण्या -
1. ११ जून २०१९ च्या कराराचे पालन करून बेस्टच्या स्वमालकीच्या ३,३३७ बसगाड्या कायम ठेवाव्यात आणि आयुष्यमान संपलेल्या बसांच्या बदल्यात नवीन बस तातडीने विकत घ्याव्यात.
2. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची थकबाकी त्वरित देण्यात यावी, तसेच भविष्यात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय रक्कम वेळेवर मिळावी यासाठी नियोजन करावे.
3. बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करून आर्थिक स्थैर्य मिळवावे.
4. खाजगी कंत्राटदारामार्फत बस घेण्याची पद्धत कायमस्वरूपी बंद करावी.
5. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी व महापालिका समकक्ष वेतनमान लागू करावे, तसेच पदोन्नती, रिक्त पदे, कोव्हिड भत्ता, अनुकंपा नियुक्त्या या सर्व विषयांवर सकारात्मक निर्णय घ्यावा.
6. बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील हंगामी कर्मचाऱ्यांना प्रथम दिवसापासून कायम समजून त्यांचे वेतन विसंगती दूर करावी.

No comments:
Post a Comment