
मुंबई (जेपीएन न्यूज) - मुंबईतील अहमद किडवाई रोडवरील एस.एन.डी.टी. कॉलेजच्या बाजूला असलेले मनोरंजन मैदान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे उपाध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या मैदानाचा भाडेकरार रद्द करावा अशी मागणी महापालिकेकडे केली आहे.
रवी राजा यांनी महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, या मैदानाचा काही भाग एस.एन.डी.टी. कॉलेज व इतर संस्थांना तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला होता. मात्र, संबंधित संस्थांनी महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून मैदानाचा वापर व्यावसायिक पद्धतीने सुरू ठेवला आहे. यामुळे हे मैदान खऱ्या अर्थाने मनोरंजनासाठी वापरले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राजा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, “महापालिकेने दिलेला भाडेकरार (Lease) हा तात्पुरता होता. मात्र, आता तो दुरुपयोग होत असल्याचे दिसत आहे. मैदानाचा वापर मनोरंजनाऐवजी व्यावसायिक कारणांसाठी होऊ लागला आहे. त्यामुळे हा करार रद्द करून महापालिकेने हे मैदान पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावे.”
त्यांनी पुढे म्हटले आहे की, या संदर्भात महापालिकेने यापूर्वी त्यांच्या पत्रावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी लेखी पत्राद्वारे मनोरंजन मैदानाचा भाडेकरार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
रवी राजा यांनी महापालिकेला सुचवले आहे की, मैदानाचा मूळ उद्देश म्हणजेच स्थानिक नागरिकांसाठी खुले मनोरंजन क्षेत्र कायम ठेवण्यासाठी हे मैदान पुनःनिर्देशित करावे. तसेच, संबंधित संस्थांकडून जर नियमांचे उल्लंघन झाले असेल तर त्यांच्यावर योग्य कारवाई करावी. पत्रासोबत त्यांनी भाडेकराराच्या प्रती आणि छायाचित्रे जोडली असून, महापालिकेकडून तातडीने उत्तर देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment