भांडूपमध्ये BIS ची कारवाई, ज्वेलरी दुकानावर छापा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भांडूपमध्ये BIS ची कारवाई, ज्वेलरी दुकानावर छापा

Share This


मुंबई - भारतीय मानक ब्युरो (BIS) ने BIS अधिनियम 2016 आणि सोन्याच्या हॉलमार्किंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भांडूप (प.) येथील एका ज्वेलरी दुकानावर धडक कारवाई केली. BIS मुंबई शाखेच्या पथकाने मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे श्री महावीर ज्वेलर्स, सलुंखे सदन, भट्टीपाडा रोड, भांडूप (प.) येथे सर्च अँड सीझर (Search & Seizure) छापा टाकला.

छाप्यात दुकानाने विविध गंभीर नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले. दुकानाच्या बोर्डावर BIS चे लोगो अनधिकृतरीत्या वापरण्यात आले होते. तसेच “100% BIS Hallmarked Jewellery” असा दावा करून ग्राहकांची दिशाभूल करण्यात येत होती. संबंधित दुकान हे BIS कडे नोंदणीकृत ज्वेलर नसतानाही पूर्वी सोन्याची विक्री केल्याचे दस्तऐवजांवरून स्पष्ट झाले.

सर्चदरम्यान दुकानात कोणतेही सोन्याचे दागिने आढळले नाहीत. फक्त इमिटेशन ज्वेलरी होती. तथापि दुकानातील बिल बुक, इनव्हॉइस, नोंदवही आदी कागदपत्रांमध्ये सोन्याची विक्री, शुद्धता आणि हॉलमार्किंगचा उल्लेख आढळला. हे सर्व दस्तऐवज BIS अधिनियमाच्या कलम 28 नुसार जप्त करून सील करण्यात आले आहेत.

या प्रकरणात BIS ने कलम 26(1)(a), 15(1), 15(2), 17(1)(a), 17(2) आणि 17(3) अंतर्गत कारवाई केली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्याला BIS अधिनियम 2016 च्या कलम 29 नुसार दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा किमान दोन लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. पुढील कायदेशीर प्रक्रिया म्हणून BIS न्यायालयात तक्रार दाखल करणार आहे.

BIS ने ग्राहकांना आवाहन केले आहे की सोन्याचे दागिने खरेदी करताना BIS हॉलमार्कची सत्यता ‘BIS CARE’ मोबाईल अ‍ॅपद्वारे तपासावी. तसेच अनिवार्य BIS प्रमाणित नसलेल्या उत्पादनांची विक्री किंवा ISI मार्क/हॉलमार्कचा गैरवापर दिसल्यास तक्रार BIS मुंबई शाखेकडे पाठवावी. ग्राहकाची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे BIS ने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages