एक दिवस SIR, दुसऱ्या दिवशी पालिका ड्युटी; परिपत्रक रद्द करण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2026

एक दिवस SIR, दुसऱ्या दिवशी पालिका ड्युटी; परिपत्रक रद्द करण्याची मागणी


मुंबई JPN NEWS - मतदार यादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अर्थात SIRच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ड्युटी आणि वेतनाबाबत स्पष्टता नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित परिपत्रक रद्द करावे किंवा त्याबाबत स्पष्ट नवीन परिपत्रक जारी करावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे.

SIRच्या कामासाठी महापालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवडणूक विभागाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या परिपत्रकानुसार संबंधित कर्मचाऱ्यांनी एक दिवस मतदार यादी पुनरिक्षणाचे काम आणि दुसऱ्या दिवशी महापालिकेचे नियमित काम करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात काही कर्मचाऱ्यांना सध्या निवडणूक विभागाकडे काम उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांच्या मूळ महापालिका कार्यालयात पूर्णवेळ काम करण्यास सांगण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे.

निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना, “सध्या काम नसल्याने पालिकेच्या कार्यस्थळी परत जा; भविष्यात गरज भासल्यास पुन्हा बोलावले जाईल,” असे सांगण्यात येत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

उपस्थिती आणि वेतनाबाबत संभ्रम - 
एक दिवसाआड अशा स्वरूपात ड्युटी लावण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांची उपस्थिती नेमकी कोणत्या कार्यालयात आणि कोणत्या पद्धतीने नोंदवली जाणार, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच SIRच्या कामासाठी दिलेल्या ड्युटीचा आणि महापालिकेतील नियमित कामाचा समन्वय साधताना वेतनावर परिणाम होणार नाही ना, याबाबतही कर्मचाऱ्यांमध्ये चिंता आहे.

कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीपटावरील नोंद, कामाचे दिवस आणि वेतनाची निश्चित पद्धत याबाबत प्रशासनाने स्पष्टता आणणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित परिपत्रक तातडीने रद्द करावे किंवा उपस्थिती, ड्युटी आणि वेतनाबाबत कोणतीही संदिग्धता राहणार नाही, अशा स्वरूपाचे सुधारित परिपत्रक काढावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS