दस्त नोंदणीसाठी "आधार" आवश्यक; १ ऑक्टोबरपासून ६३ प्रकारच्या नोंदींना लागू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2026

दस्त नोंदणीसाठी "आधार" आवश्यक; १ ऑक्टोबरपासून ६३ प्रकारच्या नोंदींना लागू


मुंबई JPN NEWS - स्थावर मालमत्तेशी संबंधित खरेदी-विक्री, गहाणखत, वाटणीखत यांसह ६३ प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी आधार ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारातील फसवणुकीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. यासंदर्भातील राजपत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत स्थावर मालमत्तांच्या दस्तांची नोंदणी केली जाते. खोटे साक्षीदार किंवा खोटे पक्षकार उभे करून होणाऱ्या फसवणुकीला या निर्णयामुळे आळा बसण्यास मदत होईल. तसेच नोंदणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी होऊन कामकाज अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा आहे.

ज्या व्यक्तींकडे अद्याप आधार क्रमांक उपलब्ध नाही, त्यांनी आधार नोंदणी केल्याची पावती, अन्य सरकारी ओळखपत्रे तसेच संबंधित व्यक्तीशी असलेले नाते सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत सादर करावी लागतील. संबंधित कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच व्यवहार अंतिम केला जाणार आहे.

बालकांसाठी विशेष तरतूद - 
१८ वर्षांखालील बालकांच्या बाबतीत त्यांच्या माता-पिता किंवा कायदेशीर पालकांच्या संमतीने आधार नोंदणी अर्ज करता येईल. केवळ आधार क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे कोणत्याही बालकाला किंवा पात्र लाभार्थ्याला दस्त नोंदणीच्या सुविधेपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी तरतूद अधिसूचनेत करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS