बहिण लाडकी, भाऊबीज देवाभाऊंची - पहिला विशेष कार्यक्रम अंधेरीत संपन्न - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बहिण लाडकी, भाऊबीज देवाभाऊंची - पहिला विशेष कार्यक्रम अंधेरीत संपन्न

Share This

मुंबई - भाऊबीजच्या निमित्ताने "बहिण लाडकी, भाऊबीज देवाभाऊंची" या विशेष उपक्रमाची सुरुवात आज अंधेरी (पूर्व) येथील शेरे पंजाब मैदानावर झाली. उत्तर पश्चिम मुंबई भाजप महिला मोर्चाच्यावतीने आयोजित या पहिल्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात उपस्थित बहिणींना भाऊबीज ओवाळणी म्हणून साड्या भेट देण्यात आल्या. जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा प्रीती सातम यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा, आमदार मुरजी पटेल, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

"महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवा" – अमित साटम
अमित साटम म्हणाले, “या मैदानावरच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ कार्यक्रम झाला होता आणि सर्वांच्या आशीर्वादाने देवाभाऊंना प्रेम मिळाले होते. आज ‘बहिण लाडकी, भाऊबीज देवाभाऊंची’ कार्यक्रमातून पुन्हा तोच स्नेह अनुभवतो आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की मुंबईत भ्रष्टाचारमुक्त सत्ता आणणे अत्यावश्यक आहे. विरोधक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र नागरिकांनी विकासाचा मार्ग स्वीकारून महापालिकेत महायुतीचा भगवा फडकवावा. “आपला महापौर महायुतीचा असायलाच हवा. प्रत्येक कार्यकर्त्याने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,” असे साटम यांनी आवाहन केले.

मुंबई सुरक्षिततेचा फडणवीस मॉडेल - 
साटम यांनी मुंबईच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे योगदान अधोरेखित केले. “२०१४पूर्वी सीसीटीव्हीची घोषणा झाली पण काम झाले नाही. फडणवीस सरकारने २०१६ मध्ये सहा हजार कॅमेरे बसवले. त्यामुळे आज महिला रात्री अपरात्रीही सुरक्षितपणे फिरू शकतात,” असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे मुंबई विकासाच्या गतीमान मार्गावर आहे आणि नुकत्याच झालेल्या सर्व्हेनुसार मुंबई हे परंपरा, संस्कृती आणि सुरक्षिततेत देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर ठरले आहे.

ध्वनीचित्रण गीताचे अनावरण - 
या कार्यक्रमात प्रीती सातम यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या भाजप महिला मोर्चावर आधारित ध्वनीचित्रण गीताचे अनावरण अमित साटम यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रीती सातम यांनी सांगितले, “देवाभाऊंच्या प्रेरणेतून महिलांसाठी हा खास भाऊबीज सोहळा आयोजित केला आहे. सरकारच्या योजनांची माहिती प्रत्येक भगिनींपर्यंत पोहोचवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.”

कार्यक्रमादरम्यान सहा विधानसभा क्षेत्रांतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. सुरुवातीला विविध वर्गातील महिलांनी साटम यांची ओवाळणी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages