
मुंबई (जेपीएन न्यूज) - झोपडपट्टीवासीयांना योग्य निवारा आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी रिपब्लिकन झोपडपट्टी संघ तर्फे मुंबईतील आजाद मैदानात ३० ऑक्टोबर रोजी एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे तात्काळ पुनर्वसनाची मागणी करत “घर द्या, न्याय द्या” अशा घोषणा देत आझाद मैदानाचा परिसर दणाणून सोडला.
संघटनेचे प्रमुख विट्ठलराव जनार्दन सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात मोहम्मद रिजवान शेख, प्रकाश आहीवाले, दादासाहेब यादव, जीवन भालेराव, राजू रणबहादुर, भिकाजी कमले, कमालुद्दीन शेख, मयुरी शिंदे, जुबेदा शेख, खुशनुदा बानो, सुनीता देवी, नसीबुल निशा यांच्यासह हजारो झोपडपट्टीधारक सहभागी झाले होते.
विट्ठलराव सोनावणे म्हणाले, “सरकारने आमच्या झोपडपट्ट्या तोडल्या, पण पुनर्वसनाची कोणतीही सोय केली नाही. अनेक कुटुंबे रस्त्यावर आहेत. सरकारने तात्काळ पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करून आम्हाला घर देणे ही त्यांची जबाबदारी आहे. आमचा संघर्ष झोपडपट्टीवासीयांच्या हक्कासाठी आहे आणि तो आम्ही मागे हटणार नाही.”
सावित्रीबाई फुले झोपडपट्टी संघाचे अध्यक्ष रिजवान शेख म्हणाले, “ही सरकार गरीबांच्या नव्हे, तर श्रीमंतांच्या बाजूने उभी आहे. जून २०२४ पासून घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील झोपडपट्टीधारकांना बेघर करण्यात आले, पण पुनर्वसनाच्या बाबतीत सरकार मौन बाळगत आहे. हे जनविरोधी धोरण त्वरित थांबवावे.”
या आंदोलनाद्वारे झोपडपट्टीवासीयांनी ‘पुनर्वसन हा आमचा हक्क आहे’ असा संदेश दिला. मागण्या लवकर मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने सरकारला दिला आहे.

No comments:
Post a Comment