
मुंबई - लोकशाहीची बूज राखणारे आणि लोकशाहीचं नेतृत्व करणारे पक्ष आज इथे जमले आहेत. सत्ताधारी आणि निवडणूक आयोगानं ही ताकद पाहून घ्यावी, ठिणगी पडलीय, वणवा कधीही पेटेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘सत्याचा मोर्चा’मध्ये गरजले.
उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधत म्हटलं, “माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, वडील चोरायचा प्रयत्न केला आणि आता मतांची चोरी करत आहेत. यांची भूक काही केल्या शमत नाही.” यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उल्लेख ‘ऍनाकोंडा’ असा करत सडकून टीका केली.
महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या संयुक्त आयोजनात झालेल्या या मोर्चात उद्धव ठाकरेंनी एक धक्कादायक किस्सा सांगितला — “काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे अधिकारी घरी आले. माझ्याच नावाने – उद्धव बाळासाहेब ठाकरे – अर्ज दाखल करण्यात आला होता. पण तो अर्ज मी केला नव्हता. माझ्या आणि कुटुंबातील सदस्यांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न झाला.”
उद्धव ठाकरेंनी सांगितले की, हा अर्ज २३ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘सक्षम’ ऍपवरून खोट्या मोबाईल नंबरद्वारे करण्यात आला होता आणि त्यावरून ओटीपी घेण्याचाही प्रयत्न झाला. या संदर्भात त्यांनी औपचारिक तक्रार दाखल केल्याचं स्पष्ट केलं.
मतदार यादीतील गोंधळ, दुबार मतदार आणि मतचोरीचे पुरावे घेऊन आम्ही कोर्टात जाणार आहोत, असं ठाकरेंनी जाहीर केलं. “निवडणूक आयुक्त लाचार आहेत, त्यामुळे न्यायालयाकडूनच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे,” असंही ते म्हणाले.
“शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि कम्युनिस्ट पक्षांचे कार्यकर्ते मतचोरीचे प्रयत्न हाणून पाडतील. पण मतदारांनीही जागरूक राहणं गरजेचं आहे,” असा इशारा देत उद्धव ठाकरेंनी भाषणाची सांगता केली.

No comments:
Post a Comment