
मुंबई (जेपीएन न्यूज) - मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (२ नोव्हेंबर) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
मध्य रेल्वे (CSMT–विद्याविहार) -
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक राहणार आहे. या काळात सीएसएमटीहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सुटणाऱ्या लोकल गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला येथे थांबतील आणि पुढे विद्याविहारवर धीम्या मार्गावर येतील. घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या दरम्यान सुटणाऱ्या गाड्या अप जलद मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर मार्ग (कुर्ला–वाशी) -
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत ब्लॉक राहील. सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या आणि पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या काही गाड्या रद्द राहतील. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी–कुर्ला आणि पनवेल–वाशी विभागांमध्ये विशेष स्थानिक गाड्या चालवल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वे (चर्चगेट–मुंबई सेंट्रल) -
पश्चिम मार्गावरही जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असून तो सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत राहील. या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रलदरम्यानच्या जलद मार्गांवरील गाड्या धीम्या मार्गांवर चालवल्या जातील. काही गाड्या रद्द राहतील, तर काही गाड्या दादर किंवा वांद्रे येथे शॉर्ट टर्मिनेट अथवा रिव्हर्स केल्या जातील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ब्लॉक काळात पर्यायी प्रवासाची पूर्वतयारी ठेवण्याचे आवाहन केले आहे.

No comments:
Post a Comment