महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’

Share This

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विभागाने ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’चे आयोजन केले आहे. ही सहल पूर्णपणे मोफत असून चैत्यभूमीला भेट देणाऱ्या पर्यटक व अनुयायांसाठी खुली आहे.

या सर्किटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, परळ येथील बीआयटी चाळ, राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स कॉलेज, वडाळा, सिद्धार्थ महाविद्यालय (फोर्ट) यांचा समावेश आहे. बाबासाहेबांचे कार्य, विचार आणि प्रेरणादायी जीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

पर्यटन संचालनालयाच्या माहितीनुसार, नागरिकांना बाबासाहेबांच्या कार्याचा जवळून अनुभव देण्यासाठी ही विशेष टूर आयोजित करण्यात आली आहे. दररोज तीन बस सोडल्या जातील व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. सहभागींसाठी मोफत प्रवास, मार्गदर्शक आणि अल्पोपहार यांची सुविधा उपलब्ध असेल.

पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले की, “आंबेडकर पर्यटन परिपथ ही केवळ पर्यटन योजना नसून भारतीय लोकशाहीचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन आहे. त्यांच्या संघर्षमय जीवनाचे दर्शन नव्या पिढीला होईल.”

शुभारंभ : ३ डिसेंबर 
टूर सर्किटचा शुभारंभ ३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता वीर सावरकर स्मारकाजवळील गणपती मंदिर, शिवाजी पार्क येथे होणार आहे. सहलीची सुरुवात आणि समारोप दोन्ही चैत्यभूमी, दादर येथेच होतील. नागरिक व पर्यटकांना या प्रेरणादायी टूर सर्किटमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages