
मुंबई - शाश्वत आणि आधुनिक टपाल सेवेकडे वाटचाल करत डाक विभाग, महाराष्ट्र सर्कल यांनी पोस्टमन व पोस्टवुमनसाठी 200 ई-बाईक्स सुरू केल्या आहेत. मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिस (GPO) येथे आयोजित विशेष कार्यक्रमात या ई-बाईक्सचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे अंतिम टप्प्यातील (लास्ट-माईल) वितरण अधिक वेगवान, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
या कार्यक्रमाला अमृता फडणवीस, अमिताभ सिंग (मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल) यांच्यासह टपाल विभागाचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
ई-बाईक्सच्या लोकार्पणानिमित्त विशेष टपाल कव्हरचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अमिताभ सिंग यांनी पहिला अल्बम अमृता फडणवीस यांना सुपूर्द केला. वाढत्या पार्सल वितरणाच्या पार्श्वभूमीवर ई-बाईक्समुळे वितरण वेळ कमी होईल, कर्मचाऱ्यांवरील शारीरिक ताण घटेल आणि शहरी भागात सेवा अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याच कार्यक्रमात 1971 च्या ऐतिहासिक लोंगेवाला युद्धातील विजयाच्या स्मरणार्थ विशेष टपाल कव्हरचेही प्रकाशन करण्यात आले. या कव्हरवर आगामी फीचर फिल्म ‘बॉर्डर 2’ मधील दृश्यांचा समावेश असून, ऐतिहासिक शौर्यगाथेला आधुनिक सिनेमॅटिक संदर्भ देण्यात आला आहे.
तसेच, “SANDESE VEERON KO” पोस्टकार्ड मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत नागरिक आणि विद्यार्थ्यांना देशाच्या वीर जवानांसाठी कृतज्ञतेचे संदेश पोस्टकार्डद्वारे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे संदेश भारत पोस्टच्या माध्यमातून थेट जवानांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.
कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत, भारत पोस्टचा हा पर्यावरणपूरक उपक्रम देशातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विभाग म्हणून त्याची ओळख अधिक बळकट करेल, असे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी ई-बाईक्सना हिरवा झेंडा दाखवून अधिकृतपणे रवाना केले.

No comments:
Post a Comment