मुंबईच्या वायुप्रदूषणावर रवी राजा यांचा घणाघात; ‘नोटिसा नव्हे, कठोर कारवाई हवी’ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईच्या वायुप्रदूषणावर रवी राजा यांचा घणाघात; ‘नोटिसा नव्हे, कठोर कारवाई हवी’

Share This

मुंबई - मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावरून (Mumbai Pollution) माजी विरोधी पक्षनेते व भाजप मुंबई उपाध्यक्ष रवी राजा (Ravi Raja) यांनी महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. प्रदूषण नियंत्रणात अपयशी ठरल्याबद्दल बीएमसीच्या २० वॉर्ड अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्या, तरी केवळ नोटिसांनी मुंबईची विषारी हवा स्वच्छ होणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. (Mumbai News)

बीएमसीने प्रदूषण नियंत्रणासाठी २९ बाबींचे पालन बंधनकारक केले असतानाही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला. आजही सुमारे ३४ टक्के बांधकाम प्रकल्पांवर अनिवार्य एअर मॉनिटरिंग सिस्टीमच नाही, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील अनेक भागांत AQI १८० ते २१० च्या पुढे जात असून शहरातील हवा ‘खराब ते अतिगंभीर’ श्रेणीत पोहोचली आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून खोकला, श्वसनाचे त्रास वाढले आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर मैदानी हालचालीही असुरक्षित ठरत आहेत.

“ही केवळ प्रशासकीय किंवा कागदोपत्री चूक नाही, तर थेट सार्वजनिक आरोग्याची आपत्कालीन परिस्थिती आहे,” असे सांगत रवी राजा यांनी बीएमसीकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. कठोर दंड, काम बंद करण्याचे आदेश (स्टॉप-वर्क), रिअल-टाइम अनुपालन तपासणी आणि वैयक्तिक जबाबदारी निश्चित केल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये यासाठी बीएमसीने तातडीने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages