BMC Election - उद्या सकाळी १० वाजता २३ केंद्रांवर मतमोजणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

BMC Election - उद्या सकाळी १० वाजता २३ केंद्रांवर मतमोजणी

Share This

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत आज (१५ जानेवारी २०२६) पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू होणार आहे. मुंबईतील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या २३ मतमोजणी कक्षांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार असून, यासाठी सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे.

माननीय भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मतमोजणीदरम्यान सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत विशेष दक्षता घेण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील २२७ निवडणूक प्रभागांसाठी २३ निवडणूक निर्णय अधिकारी (R.O.) नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक निर्णय अधिकारी कार्यालयांतर्गत स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली असून, या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस खात्याची आवश्यक मान्यता मिळाली आहे.

आज महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्त विश्वास शंकरवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी फरोग मुकादम यांच्यासह २३ निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण २,२९९ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये ७५९ पर्यवेक्षक, ७७० सहायक आणि ७७० चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचा समावेश आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले असून, मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व अचूक राहण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन व वैद्यकीय सुविधा, तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. मतमोजणी ठिकाणी केवळ निवडणूक विभागाने ओळखपत्र दिलेल्या अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.

मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण, सुरळीत व विश्वासार्ह पद्धतीने पार पडावी आणि लोकशाहीवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages