BMC Election - कांदिवलीतील मतदान अधिकाऱ्यांकडून मतदारांची नावे शोधण्यासाठी भाजपच्या अ‍ॅपचा वापर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

BMC Election - कांदिवलीतील मतदान अधिकाऱ्यांकडून मतदारांची नावे शोधण्यासाठी भाजपच्या अ‍ॅपचा वापर

Share This

मुंबई - मुंबईच्या कांदिवली येथील एका मतदान केंद्रावर नेमलेले निवडणूक अधिकारी मतदारांची नावे शोधण्यासाठी भाजपच्या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष व तटस्थ असणे अपेक्षित असताना, एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या अ‍ॅपचा वापर होत असल्याने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

या घटनेमुळे स्थानिक मतदारांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून, या प्रकरणाची निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. यावेळी येथील शिवसेना ठाकरे गटाचे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकारचा तीव्र निषेध केला आहे.

यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या अधिकृत उमेदवाराने सांगितले की, प्रभाग क्रमांक 19 कांदिवली येथे मुंबई महापालिकेने जे अधिकारी नेमले आहेत, ज्यांचे काम मतदारांचे नाव शोधणे हे आहे आणि यासाठी महापालिकेचे वेगळे अ‍ॅप्लिकेशन असताना सुद्धा भाजपचे अ‍ॅप वापरुन तसेच येथील स्थानिक उमेदवारांचे अ‍ॅप वापरुन मतदारांची नावे शोधून देत आहेत आणि ते भाजपला प्रमोट करत असल्याचा दावा करण्यात आला.

सरकारी अधिकारीच भाजपचा प्रचार करत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच सगळ्या प्रभागातील व मतदान केंद्रातील अधिकारी कोणते अ‍ॅप वापरत आहेत, याचा देखील तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages