मुंबईत हॉर्सट्रेडिंगच्या चर्चांना उधाण, महापौरपदासाठी गुप्त हालचाली वेगात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत हॉर्सट्रेडिंगच्या चर्चांना उधाण, महापौरपदासाठी गुप्त हालचाली वेगात

Share This

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (BMC Election) भाजप (BJP) –शिंदे (Eknath Shinde) गटाला काठावरचे बहुमत मिळाल्यानंतर महापौरपदावरून राजकीय रस्सीखेच तीव्र झाली आहे. सत्तास्थापनेआधीच पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असून, हॉर्सट्रेडिंगच्या चर्चांनी मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. (Mumbai News) 

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या काही नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले असल्याचे समजते. बीएमसीतील सत्तास्थापना होईपर्यंत हे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आल्याने महापौरपदासाठी ११४ या ‘मॅजिक फिगर’पर्यंत पोहोचण्यासाठी शिंदे गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपसमोर अडीच-अडीच वर्षे महापौरपदाची समान वाटणी करण्याचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. तसेच स्थायी समिती आणि इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकांना योग्य प्रतिनिधित्व देण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, शिंदे गटातील काही नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या नगरसेवकांनी ठाकरे गटातील एका जवळच्या व्यक्तीशी संवाद साधून, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी कोणतेही वैर नसल्याचे सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महापौरपदाबाबत सूचक वक्तव्य केल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. “देवाच्या मनात असेल तर मुंबईचा पुढचा महापौर आपलाच असेल,” असे वक्तव्य त्यांनी केल्याचे सांगितले जाते.

बीएमसीतील सत्तास्थापनेपूर्वी सुरू असलेल्या या गुप्त हालचालींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages