मुंबई - महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभाबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल, मात्र जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास आयोगाने स्पष्टपणे मज्जाव केला आहे.
महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू असताना तसेच मतदानाच्या काही दिवस आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर थेट लाभ जमा करण्याचे सत्ताधाऱ्यांचे नियोजन होते. मिळालेल्या माहितीनुसार १४ जानेवारी रोजी डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा मिळून एकूण ३,००० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली होती. मात्र १५ जानेवारी रोजी मतदान असल्याने, मतदानाच्या आदल्या दिवशी लाभ देण्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती.
महिला मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठीच हा लाभ दिला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. हे प्रकरण थेट राज्य निवडणूक आयोगाकडे पोहोचल्याने आयोगाने याची दखल घेत सरकारच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, जानेवारी महिन्याचे १,५०० रुपये लाडक्या बहिणींना देता येणार नाहीत. त्यामुळे आता १४ जानेवारी रोजी अपेक्षित असलेले ३,००० रुपये न मिळता केवळ डिसेंबर महिन्याचे १,५०० रुपयेच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. या निर्णयामुळे निवडणूक काळात सरकारी योजनांच्या लाभवाटपावर आयोगाची कठोर नजर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

No comments:
Post a Comment