
ठाणे - ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या (Thane Municipal Election) पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावूनही कर्तव्यावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले आहे.
निवडणूक ही अत्यावश्यक व संवैधानिक प्रक्रिया असून, त्यामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडणे बंधनकारक आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही तसेच कारणे दाखवा नोटीस बजावूनही कर्तव्यावर हजर न राहता शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम तसेच संबंधित कायद्यांतर्गत फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत असून, यापुढेही निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होत असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. त्यामुळे नियुक्त कर्मचाऱ्यांनी कोणतीही सबब न देता निवडणूक कर्तव्यावर वेळेत हजर राहावे, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:
Post a Comment