मुंबईत ८५ लाख मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण पूर्ण, उर्वरित १५ लाख चिठ्ठ्या मतदान केंद्रांवर उपलब्ध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 January 2026

मुंबईत ८५ लाख मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण पूर्ण, उर्वरित १५ लाख चिठ्ठ्या मतदान केंद्रांवर उपलब्ध


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ (BMC Election) अंतर्गत गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर सुमारे ८५ लाख मतदारांपर्यंत मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. उर्वरित १५ लाख मतदारांच्या माहिती चिठ्ठ्या थेट मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली.

मतदारांचे नाव, पत्ता, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव व खोली क्रमांक अशी सविस्तर माहिती असलेल्या या चिठ्ठ्या घरोघरी पोहोचविण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागाने पार पाडली आहे. निर्धारित कालावधीत ही प्रक्रिया अचूक व वेळेत पूर्ण करण्यात आली आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी मुंबईकर मतदारांना आवाहन करत १५ जानेवारी रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. मतदारांना मतदान प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने हा वैधानिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदार माहिती चिठ्ठ्यांच्या वितरणासाठी एकूण ६,७०१ कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये ५,१३८ कर्मचारी, ९४५ स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, १०० आशा कार्यकर्त्या आणि ५१८ बूथ स्तर अधिकारी (BLO) यांचा समावेश आहे.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने १०,२३१ मतदान केंद्रांवर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मतदार व कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ४ हजारांहून अधिक पोर्टेबल व मोबाइल शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, सर्व मतदान केंद्रांवर अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

महानगरपालिकेच्या या तयारीमुळे मुंबईतील मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, स्वच्छ आणि सुव्यवस्थित होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS