मतदान प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास कठोर कारवाई, डॉ. अश्विनी जोशी यांचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 January 2026

मतदान प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास कठोर कारवाई, डॉ. अश्विनी जोशी यांचा इशारा


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण सत्रास उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मतदान प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी–कर्मचाऱ्यांनी तातडीने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी (R.O.) यांच्याशी संपर्क साधावा, अन्यथा निवडणूक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राध्यक्ष (PRO) व सहायक मतदान अधिकारी (APRO) यांचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सध्या विविध ठिकाणी सुरू असून हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे व बंधनकारक आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यासाठी १० हजार २३१ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या मतदान केंद्रांसाठी एकूण ६४ हजार ३७५ अधिकारी–कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून सध्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे. मात्र, काही अधिकारी–कर्मचारी या प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले आहे.

निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विनाविलंब प्रशिक्षण पूर्ण करून निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे. निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहणाऱ्या किंवा कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध निवडणूक कायद्यांतर्गत कडक शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल, असा सक्त इशाराही त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS