यापैकी एक ओळखपत्र दाखवा आणि मतदान करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

यापैकी एक ओळखपत्र दाखवा आणि मतदान करा

Share This

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ (BMC Election) अंतर्गत मतदान करताना मतदारांनी छायाचित्र (Voter ID Card) असलेले मतदार ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे. मात्र, ज्या पात्र मतदारांकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र उपलब्ध नाही, त्यांनी माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेल्या १२ प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा सादर केल्यास मतदान करता येईल, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली.

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर मतदारांनी स्वतःची ओळख पटविण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करावे. ओळखपत्र नसल्यास राज्य निवडणूक आयोगाने दिनांक १४ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार निश्चित १२ पर्यायी पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.

लोकशाही प्रक्रियेत मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून, ओळख पडताळणीमुळे मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यास मदत होईल, असेही गगराणी यांनी नमूद केले आहे.

मतदार ओळखपत्र नसल्यास ग्राह्य धरले जाणारे पर्यायी पुरावे:
भारताचे पारपत्र, आधार ओळखपत्र, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांची फोटो ओळखपत्रे, राष्ट्रीयकृत बँक किंवा टपाल खात्याचे फोटो असलेले पासबुक, दिव्यांग प्रमाणपत्र, मनरेगा जॉब कार्ड, निवृत्तीवेतन विषयक फोटो कागदपत्रे, संसदे/विधानमंडळ सदस्यांची अधिकृत ओळखपत्रे, स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र तसेच केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा कार्ड.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी आवश्यक ओळखपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages