मुंबई महापालिका निवडणूक मतमोजणी पारदर्शक व कायद्याच्या चौकटीत होणार – डॉ. अश्विनी जोशी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 January 2026

मुंबई महापालिका निवडणूक मतमोजणी पारदर्शक व कायद्याच्या चौकटीत होणार – डॉ. अश्विनी जोशी


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठीची मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निर्भय व कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हेतुपुरस्सर किंवा अनावधानानेही चूक होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महापालिका मुख्यालयात आज (८ जानेवारी) २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह उप आयुक्त, सहायक आयुक्त व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्त विश्वास शंकरवार, उप आयुक्त किशोर गांधी, अतिरिक्त जिल्हाधिकारी फरोग मुकादम, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्यासह परिमंडळ उप आयुक्त व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. जोशी यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून मतदान प्रक्रियेत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. छायाचित्रांसह मतदार यादी अंतिम करण्यात आली असून मतदान केंद्रांची निश्चिती झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने काही मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात आले असून, त्याची माहिती तत्काळ राजकीय पक्ष व उमेदवारांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून मतमोजणी शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रस्ताव, मतमोजणी प्रक्रिया, कर्मचारी नेमणूक, ईव्हीएम तपासणी व कार्यान्वयन (EVM Commissioning), उमेदवार व राजकीय पक्षांशी बैठक, टपाली मतदान प्रक्रिया आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मतमोजणी केंद्रांवर धातूशोधक यंत्रे बसविणे, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच सर्व कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त, नियमित गस्त आणि तांत्रिक निगराणी व्यवस्था कार्यान्वित करण्यात आल्याचेही डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक ही निर्भय, मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा पूर्ण कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS