राजावाडी रुग्णालयाच्या पाहणीनंतर किशोरी पेडणेकरांचा सुरक्षा व खाजगीकरणावर सवाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 February 2026

राजावाडी रुग्णालयाच्या पाहणीनंतर किशोरी पेडणेकरांचा सुरक्षा व खाजगीकरणावर सवाल


मुंबई - घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाला (Rajawadi Hospital) भेट दिल्यानंतर पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी रुग्णालयाच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि आरोग्य खात्याच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना दिसून येत नसल्याचे त्या म्हणाल्या. “रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी रुग्णालय अधिक सुसज्ज आणि सक्षम असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच आरोग्य खात्यावर नेमका किती खर्च केला जातो, याबाबत पारदर्शकता असावी, अशी मागणी त्यांनी केली.

महानगरपालिकेच्या रुग्णालयांच्या खाजगीकरणाच्या शक्यतेवर बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, “पालिका रुग्णालयांचे खाजगीकरण होता कामा नये. खाजगीसारखी सुविधा देण्याचा प्रयत्न असला तरी पूर्ण खाजगीकरणाला आमचा ठाम विरोध राहील.”

सरकारकडून काही योजना बंद करण्यात आल्याच्या मुद्द्यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “ज्यांनी योजना सुरू केल्या, त्यांनीच त्या बंद करण्याबाबत उत्तर द्यावे. आधी गोड बोलून योजना जाहीर करायच्या आणि नंतर मागे घ्यायच्या, हे योग्य नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, मासे विक्रेत्यांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. “मासे खरेदी करताना दर्जा तपासून घ्यावा. स्वस्त मिळत आहेत म्हणून घाई करू नये. मुंबईतील कोळी बांधवांकडून चांगल्या प्रतीचे मासे खरेदी करावेत, कारण लोकांच्या आरोग्याशी तडजोड होता कामा नये,” असे त्यांनी सांगितले.

या भेटीनंतर राजावाडी रुग्णालयातील सुविधा, सुरक्षा आणि प्रशासनाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS