सायनमध्ये “शिवस्पंदन – २०२६” उत्साहात; डॉक्टरांच्या “सपान” एकांकिकेने रंगला सोहळा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सायनमध्ये “शिवस्पंदन – २०२६” उत्साहात; डॉक्टरांच्या “सपान” एकांकिकेने रंगला सोहळा

Share This

मुंबई - सायन मार्डच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित “शिवस्पंदन – २०२६” हा सांस्कृतिक सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला. कार्यक्रमात पारंपरिक नृत्य, पोवाडा, लेझीम तसेच प्रभावी नाटिका सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर जागर प्रसार करण्यात आला.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते “सपान” या राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त एकांकिकेचे सादरीकरण. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चारही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या “डॉक्टर ग्रुप” तर्फे सादर करण्यात आलेली ही पहिलीच एकांकिका असून तिने राज्यस्तरावर तब्बल २८ पुरस्कारांची कमाई केली आहे.

डॉक्टर्स थिएटर ग्रुपमधील डॉ. दिग्विजय जाधव, डॉ. हर्षद रौंदळ, डॉ. चिन्मय केळकर, डॉ. ऋतुजा राऊत आणि डॉ. समीर बडगे यांच्या प्रभावी अभिनयाने उपस्थित शिवसैनिक व प्रेक्षक भारावून गेले. सामाजिक आशय, वैचारिक गाभा आणि भावनिक सादरीकरण यामुळे “सपान” एकांकिकेला उत्स्फूर्त दाद मिळाली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय) डॉ. शैलेश मोहिते यांनी डॉक्टरांच्या या कलाकृतीचे विशेष कौतुक करत ही समाजप्रबोधनपर एकांकिका नायर रुग्णालयातही सादर करण्याबाबत सूचना केली. तसेच सर्व सहभागी डॉक्टरांचा सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता इंगळे यांनी कार्यक्रमाबद्दल “न भूतो न भविष्यती” असे गौरवोद्गार काढले. शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. सुधीर पवार हे देखील प्रयोगादरम्यान भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

या कार्यक्रमाला बीएमसी मार्डचे अध्यक्ष डॉ. चिन्मय केळकर आणि उपाध्यक्ष डॉ. दिग्विजय जाधव यांनी उपस्थिती दर्शवून संपूर्ण उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

एकंदरीत “शिवस्पंदन – २०२६” हा कार्यक्रम समाजप्रबोधन, वैचारिक चिंतन, भावनिक स्पर्श आणि सामाजिक जाणीव जागवणारा ठरला अशी माहिती बीएमसी मार्डचे अध्यक्ष तथा सायन मार्डचे अध्यक्ष डॉ. रवी सपकाळ यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages