मुंबईत स्नॅक्सच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेत प्रिती सातम यांचा ठराव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत स्नॅक्सच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेत प्रिती सातम यांचा ठराव

Share This

मुंबई - शहरात वाढत्या कचऱ्याला आणि पावसाळ्यात नाले तुंबण्याच्या समस्येला वेफर्स, चिवडा व इतर कुरकुरीत स्नॅक्सच्या अविघटनशील प्लास्टिक वेष्टनांमुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम (BJP Priti Satam) यांनी मुंबई महापालिका (BMC Mumbai) सभागृहात बंदीची मागणी करणारा ठराव मांडला आहे.

सध्या पाच ते दहा रुपयांत सहज उपलब्ध होणाऱ्या वेफर्स, चिवडा आणि विविध स्नॅक्सच्या पॅकेट्सची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र या पदार्थांचे सेवन झाल्यानंतर त्यांची प्लास्टिक वेष्टने रस्त्यावर, पदपथांवर, सार्वजनिक ठिकाणी तसेच थेट नाल्यांमध्ये टाकली जात असल्याचे सर्रास आढळते. परिणामी शहरातील कचऱ्याचे प्रमाण वाढत असून स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.

सातम यांनी आपल्या सूचनेत नमूद केले आहे की, या प्लास्टिक वेष्टनांचा दर्जा अविघटनशील (non-biodegradable) असल्यामुळे ती सहज नष्ट होत नाहीत. पावसाळ्यात ही वेष्टने नाल्यांच्या तोंडाशी अडकून पाण्याचा प्रवाह रोखतात. त्यामुळे पाणी तुंबून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होते आणि मुंबई जलमय होते. साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरते तसेच आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो.

या पार्श्वभूमीवर वेफर्स, चिवडा व इतर स्नॅक्ससाठी वापरण्यात येणाऱ्या अविघटनशील प्लास्टिक पॅकेजिंगवर बंदी घालण्यात यावी, तसेच उत्पादन कंपन्या व वितरकांना विघटनशील किंवा पर्यावरणपूरक आवेष्टनाचा वापर सक्तीने लागू करण्यासाठी नियमावली तयार करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात राज्य सरकारशी पाठपुरावा करण्याचीही सूचना ठरावात करण्यात आली आहे.

शहरातील कचरा व्यवस्थापन आणि पूरस्थितीवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा ठराव महत्त्वाचा मानला जात असून, महापालिकेच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages