मुंबई महापालिकेच्या रक्तपेढ्यांचे खासगीकरण रद्द करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 February 2026

मुंबई महापालिकेच्या रक्तपेढ्यांचे खासगीकरण रद्द करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा


मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचे कामकाज खासगी संस्थांकडे देण्याच्या प्रस्तावाला अखिल पार्कसाईड सेवा संघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष सुनील काजरोळकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करत हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महापालिकेच्या सहा रुग्णालयांतील रक्तपेढ्या पीपीपी तत्त्वावर चालवण्याचा प्रस्ताव समोर आला असून, त्यामुळे रक्ताचे व्यापारीकरण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत गरीब व गरजू रुग्णांना मोफत किंवा अत्यल्प दरात रक्त व रक्तघटक उपलब्ध करून दिले जातात. खासगीकरण झाल्यास या सेवांवर परिणाम होऊन रुग्णांवर आर्थिक भार पडू शकतो, असा संघटनेचा दावा आहे.

कोविड काळात तसेच विविध आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या रक्तपेढ्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्ते व रक्तदाते यांच्या सहकार्याने गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा करण्यात आला. ही सेवा सार्वजनिक तत्त्वावरच सुरू ठेवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच, काही रुग्णालयांमध्ये आवश्यक जागेअभावी अडचणी निर्माण होत असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या समस्यांवर प्रशासकीय पातळीवर उपाययोजना कराव्यात; रक्तपेढ्या खासगी संस्थांकडे देणे हा योग्य पर्याय नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

महापालिका प्रशासनाने जनहिताचा विचार करून रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा अखिल पार्कसाईड सेवा संघाने दिला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS