
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या विविध मंडईंचा पुनर्विकास सुरू असताना मासे विक्री करणाऱ्या कोळी महिलांना तळघरात जागा देण्यात येत असल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा भाजपच्या नगरसेविका योगिता कोळी (BJP Yogita Koli) यांनी महापालिका (BMC Mumbai) सभागृहात उपस्थित केला. मंडई पुनर्विकासात मासे विक्रीसाठी तळमजल्यावरच सर्व सोयीसुविधांनी युक्त जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
आपल्या सूचनेत कोळी यांनी नमूद केले आहे की, अनेक मंडईंच्या पुनर्विकासात मासे विक्रेत्यांना तळघरात जागा देण्याची पद्धत दिसून येते. मात्र तळघरात मासे विक्री करताना कोळी महिला तसेच ग्राहकांना अनेक व्यावहारिक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः वयोवृद्ध महिलांना मासळीच्या टोपल्या व इतर साहित्य घेऊन तळघरात उतरणे अत्यंत कष्टदायक ठरते.
तळघरात पुरेशी खेळती हवा नसल्याने मासळीचा वास अधिक प्रमाणात पसरतो आणि दुर्गंधी निर्माण होते. सांडपाण्याचा योग्य निचरा न झाल्याने वारंवार गटार तुंबण्याच्या घटना घडतात. परिणामी दुर्गंधीयुक्त पाणी साचून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. पावसाळ्यात तळघरात पाणी साचण्याचा धोका अधिक वाढतो, असेही त्यांनी अधोरेखित केले.
तसेच तळघरातील जागांमध्ये स्वच्छता, वायुवीजन, निचरा व्यवस्था आणि सुरक्षितता यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे ग्राहक मासे खरेदीसाठी अशा ठिकाणी जाणे टाळतात. याचा थेट परिणाम कोळी महिलांच्या उपजीविकेवर होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर मंडई पुनर्विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेत मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात यावी आणि मासे विक्रीसाठी इमारतीच्या तळमजल्यावरच आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांनी युक्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महापालिकेची यावर काय भूमिका राहणार, याकडे कोळी समाजासह मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment