रस्ते काँक्रिटीकरणासाठी सूक्ष्म नियोजनावर भर; ९० दिवसांत महत्त्वाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2026

रस्ते काँक्रिटीकरणासाठी सूक्ष्म नियोजनावर भर; ९० दिवसांत महत्त्वाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट


मुंबई - ‘खड्डेमुक्त मुंबई’च्या दिशेने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प वेगाने पुढे सरकत असून टप्पा १ आणि टप्पा २ मिळून एकूण ६३ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. पुढील कालावधीत रस्तेनिहाय सूक्ष्म नियोजन करून हाती घेतलेले व खोदण्यात आलेले रस्ते निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले.

११ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी कामांच्या गती व गुणवत्तेबाबत सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (रस्ते) मंतय्या स्वामी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

१० फेब्रुवारी २०२६ अखेर १५९४ रस्त्यांचे एकूण ४३०.६९ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. टप्पा १ अंतर्गत निर्धारित उद्दिष्टांपैकी ७७ टक्के, तर टप्पा २ अंतर्गत ५२ टक्के कामे पूर्ण झाली असून एकत्रित प्रगती ६३ टक्के आहे. काँक्रिट रस्त्यांमुळे पावसाळ्यात खड्ड्यांचे प्रमाण अत्यल्प राहून देखभाल खर्चात बचत होणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

कामांच्या अंमलबजावणीदरम्यान नागरिकांना कमीत कमी असुविधा होईल, यासाठी रस्तेनिहाय नियोजनावर भर देण्यात येत आहे. १ ऑक्टोबर २०२५ नंतर सुरू करण्यात आलेली अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांना कामांची सविस्तर माहिती देण्यासही सांगितले.

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, दाट लोकसंख्या आणि नागरी रचनेमुळे हा प्रकल्प आव्हानात्मक असला तरी नियोजनबद्ध पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. अभियंत्यांनी कार्यस्थळी उपस्थित राहून कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष द्यावे. बेस लेव्हलपासून प्रत्येक घटकस्तर, आर्द्रता, तापमान आदी तांत्रिक निकष काटेकोरपणे पाळणे अत्यावश्यक आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे कामांची गुणवत्ता अधिक सुधारत असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यमान सत्र संपण्यापूर्वी ९० दिवसांचा कालावधी - 
विद्यमान सत्र संपण्यापूर्वी ९० दिवसांचा कालावधी उपलब्ध असून या ९० दिवसांचे सूक्ष्म नियोजन केल्यास पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरण प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा गाठता येईल, असे बांगर यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS