आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ‘भारतरत्न’ द्या, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 February 2026

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ‘भारतरत्न’ द्या, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रची मागणी


पोंभुर्ले, ता. तळेरे - मराठी पत्रकारितेचे जनक, ‘दर्पण’चे संस्थापक आणि समाजजागृतीचे अग्रदूत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रने केली आहे. पोंभुर्ले येथे जयंतीनिमित्त शासनस्तरावर अधिकृत कार्यक्रम आयोजित केली नसल्याने यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. 

मराठी पत्रकारितेचे जनक, ‘दर्पण’चे संस्थापक आणि समाजजागृतीचे अग्रदूत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१४ व्या जयंतीनिमित्त पोंभुर्ले येथे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र व तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघातर्फे अभिवादन करण्यात आले. जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जांभेकरांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जांभेकर यांचे वंशज सुधाकर रामचंद्र जांभेकर व कुटुंबीय उपस्थित होते.

जयंतीनिमित्त शासनस्तरावर अधिकृत कार्यक्रम अपेक्षित असतानाही पोंभुर्ले येथील स्मारकस्थळी कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत नाराजी व्यक्त करत नारायण पांचाळ यांनी शासनाच्या उदासीनतेवर टीका केली. “जांभेकर यांची जयंती शासन आदेशानुसार साजरी व्हावी, अशी अपेक्षा आहे. मात्र त्यांच्या जन्मस्थानीच अधिकृत अभिवादन न होणे खेदजनक आहे,” असे ते म्हणाले.

गेल्या वर्षी याच दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्रित आणून जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली होती. दरवर्षी जयंती साजरी करण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली होती. मात्र यंदा संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष झाल्याची भावना जांभेकर कुटुंबीयांनी व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्र जर्नालिस्ट युनियनचे राज्य सरचिटणीस राजेंद्र साळसकर, खजिनदार सतीश साटम, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय दुदवडकर, सचिव संजय खानविलकर, सिंधुदुर्ग अध्यक्ष गणेश चव्हाण, सुनील आचरेकर, बाजीराव जांभेकर, प्रा. प्रशांत हाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारितेचे संस्थापक आणि समाजाचा आरसा ठरलेले बाळशास्त्री जांभेकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच त्यांच्या नावाने कोकणात पत्रकारितेचे विद्यापीठ स्थापन करावे, पत्रकारितेचे अभ्यासक्रम सुरू करावेत आणि मराठी पत्रकार चळवळीचे गाव म्हणून पोंभुर्ले गावाला जागतिक दर्जाचे माहिती व पर्यटन स्थळ म्हणून मान्यता द्यावी, अशा मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे नारायण पांचाळ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS