पालिकेच्या आरोग्य खात्यातील रिक्त पदांवरून ‘ठिय्या आंदोलन’चा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 February 2026

पालिकेच्या आरोग्य खात्यातील रिक्त पदांवरून ‘ठिय्या आंदोलन’चा इशारा


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रिक्त पदांवरून कर्मचारी संघटनांनी तीव्र भूमिका घेतली आहे. २६ फेब्रुवारीला कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सामूहिक रजा घेऊन ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे.

म्युनिसिपल मजदुर युनियनचे सहाय्यक 
सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांना एक पत्र दिले आहे. या पत्रानुसार, सार्वजनिक आरोग्य खात्यातील कनिष्ठ निरीक्षक, संशोधन निरीक्षक, क्षयरोग निरीक्षक, संनिरीक्षण निरीक्षक तसेच इतर काही तांत्रिक पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. काही पदांसाठी पात्र कर्मचाऱ्यांनी आवश्यक अर्हता पूर्ण करूनही पदोन्नती आदेश जारी झालेले नाहीत. वारंवार पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि बैठका होऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

रिक्त पदांमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. विशेषतः संसर्गजन्य रोग नियंत्रण, क्षेत्रीय तपासणी, अहवाल सादरीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित अधिकाऱ्यांकडून “लवकरच पदे भरली जातील” अशी आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात भरती किंवा पदोन्नती प्रक्रियेला गती मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संयम सुटत असून आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

२६ फेब्रुवारी रोजी सामूहिक रजा घेऊन ‘ठिय्या आंदोलन’ करण्यात येणार असून, या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा प्रदीप नारकर यांनी दिला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS