राजावाडी रुग्णालयाची महापौरांकडून आकस्मिक पाहणी; औषधटंचाई, पुनर्विकास आणि स्वच्छतेवर कडक निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 February 2026

राजावाडी रुग्णालयाची महापौरांकडून आकस्मिक पाहणी; औषधटंचाई, पुनर्विकास आणि स्वच्छतेवर कडक निर्देश


मुंबई - घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी आकस्मिक पाहणी केली. रुग्णालयातील आरोग्यसेवा, स्वच्छता, औषधपुरवठा आणि सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा सखोल आढावा घेत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट आणि कडक निर्देश दिले.

महापौरांनी महिला वैद्यकीय कक्ष, पुरुष वैद्यकीय कक्ष, प्रसूती कक्ष, प्रसूतीपूर्व कक्ष, बालरोग विभाग तसेच पुरुष शल्यचिकित्सा कक्षाला भेट देत रुग्णांशी थेट संवाद साधला. रुग्णांकडून मिळालेल्या अभिप्रायातून काही गंभीर तक्रारी पुढे आल्या. विशेषतः “रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागतात” या तक्रारीची महापौरांनी तातडीने दखल घेत औषध व लसींच्या पुरवठा-वितरणाच्या नोंदवह्या तपासल्या.

लसीकरण नियमित आणि अखंडित होण्यासाठी आवश्यक साठा राखण्याचे आदेश देत, पुरवठा साखळीत कुठे अडथळे येत आहेत याचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले. दुर्धर आजारांवरील इंजेक्शनचा पुरवठा का होत नाही, याबाबतही त्यांनी अधिष्ठातांकडून माहिती मागवली आणि संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्याचे निर्देश दिले.

रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील काम संथ गतीने सुरू असल्याची बाब नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर महापौरांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधकामाचा संपूर्ण परिसर आच्छादित करण्याचे आणि धूळ-प्रदूषण टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.

अन्नपुरवठ्याच्या थाळी पद्धतीतील दर्जा सुधारण्याचे निर्देश देत “रुग्णांना पौष्टिक आणि स्वच्छ आहार मिळणे ही प्राथमिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने जुनी वायरिंग काढून नवीन बसविणे, आवश्यक तेथे रंगरंगोटी व दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले.

या पाहणीदरम्यान स्थानिक नगरसेवक धर्मेश गिरी, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (माध्यमिक आरोग्य सेवा) डॉ. पवार तसेच वैद्यकीय अधीक्षिका डॉ. भारती राजूलवाला उपस्थित होत्या.

महापौरांच्या या आकस्मिक भेटीनंतर राजावाडी रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि पारदर्शक होणार का, याकडे घाटकोपरकरांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS