सत्कार समारंभाऐवजी महापौर निधीला मदत करा, उपनगरात नवे मेडिकल कॉलेज - महापौर रितू तावडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2026

सत्कार समारंभाऐवजी महापौर निधीला मदत करा, उपनगरात नवे मेडिकल कॉलेज - महापौर रितू तावडे


मुंबई - मुंबईच्या महापौरपदाची शपथ घेतल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी उपमहापौर संजय घाडी यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षाला सदिच्छा भेट देत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सत्कार समारंभांमध्ये अनावश्यक खर्च टाळून तो निधी महापौर निधीत जमा करावा असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले. तसेच उपनगरात नवे मेडिकल कॉलेज उभारले जाईल अशी घोषणा महापौरांनी केली.

बृहन्मुंबई पालिका वार्ताहर संघाचे अध्यक्ष मारुती मोरे, उपाध्यक्ष सचिन घानजी, जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे, सरचिटणीस राजेश सावंत तसेच पत्रकारांच्या उपस्थित महापौर व उपमहापौरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

पत्रकारांशी संवाद साधताना महापौर रितू तावडे यांनी मुंबईच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला. “केंद्र, राज्य आणि मुंबई महानगरपालिकेत आपलेच सरकार असल्याने विकासकामांना वेग मिळेल. गोऱगरीब जनतेला न्याय आणि मदत देणे हे आमचे प्राधान्य राहील,” असे त्या म्हणाल्या. सत्कार समारंभांमध्ये अनावश्यक खर्च टाळून तो निधी महापौर निधीत जमा करून नागरिकांच्या हितासाठी वापरावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबई उपनगरात नव्या मेडिकल कॉलेजची उभारणी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महापौरांनी यावेळी केली. तसेच पालिकेच्या रुग्णालयांचा दर्जा उंचावून राजावाडी रुग्णालय ‘एम्स’च्या धर्तीवर विकसित करण्याचा संकल्प त्यांनी मांडला. पालिका शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठीही ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उपमहापौर संजय घाडी यांनी दर्जेदार आरोग्य सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विशेष भर देण्यात येईल, असे सांगितले. उपमहापौर पदाला आवश्यक ते अधिकार मिळणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नालेसफाई व पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष दिले जाईल, असेही महापौरांनी सांगितले. मराठी भाषा, मराठी शाळा आणि कर भरणाऱ्या मुंबईकरांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS