मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी बिनविरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2026

मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी बिनविरोध


मुंबई - मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात पार पडली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या आघाडीच्या उमेदवार रितू राजेश तावडे यांची महापौरपदी तर संजय घाडी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस ७ फेब्रुवारी २०२६ होता. या दिवशीपर्यंत दोन्ही पदांसाठी अनुक्रमे रितू तावडे आणि संजय घाडी यांचेच एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

निवड प्रक्रियेची कार्यवाही महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पिठासीन अधिकारी म्हणून पार पाडली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे उपस्थित होत्या.

या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी नव्या महापौर व उपमहापौरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

निवडीनंतर महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आगामी कार्यकाळाची रूपरेषा मांडली. त्यानंतर त्यांनी सभागृहातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले तसेच महानगरपालिका मुख्यालयासमोरील सर फिरोजशहा मेहता यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज मैदान, हुतात्मा स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन नव्या कार्यकाळाची सुरुवात करण्यात आली.

मुंबईच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात या बिनविरोध निवडीला महत्त्वाचे स्थान मिळाले असून, आगामी काळात महापालिकेच्या कारभारात स्थैर्य आणि वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS