अनधिकृत पार्किंगमुळे अग्निशमन कार्यात अडथळा; वाहनधारकांवर थेट एफआयआर दाखल होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अनधिकृत पार्किंगमुळे अग्निशमन कार्यात अडथळा; वाहनधारकांवर थेट एफआयआर दाखल होणार

Share This

मुंबई - मुंबईत आगीच्या किंवा आपत्तीच्या घटनास्थळी अग्निशमन व विमोचन कार्यात अनधिकृत वाहन पार्किंगमुळे अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनधारकांवर थेट एफआयआर दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. यामुळे आपत्कालीन मदत कार्यात होणारा विलंब टाळता येईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुंबईतील अनेक भागांत रस्त्यांच्या कडेला अनधिकृतरित्या वाहने उभी केली जात असल्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी वेळेत पोहोचताना अडचणी येत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. परिणामी जीवित व वित्तहानी वाढण्याची गंभीर शक्यता निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.

आगीच्या किंवा आपत्तीच्या ठिकाणी अनधिकृत पार्किंगमुळे अग्निशमन व विमोचन कार्यात विलंब झाल्याचे स्पष्ट झाल्यास, संबंधित अग्निशमन वाहनावरील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनाचे छायाचित्र व नोंदणी क्रमांक संकलित करून वरिष्ठांच्या परवानगीने संबंधित पोलिस ठाण्यात थेट एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई अग्निशमन दल हे नागरिकांसह प्राणी, पक्षी आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी कार्यरत असून, आपत्कालीन प्रसंगी जलद प्रतिसाद देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र अनधिकृत पार्किंगमुळे हे कार्य प्रभावीपणे करता येत नसल्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे.

दरम्यान, नागरिकांकडून अनधिकृत पार्किंगबाबत तक्रारी आल्यास त्या संबंधित पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस विभाग किंवा संबंधित विभाग कार्यालयाकडे वर्ग करून योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी दिली आहे.

महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल आणि आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन दलाला वेळेत व प्रभावीपणे कार्यवाही करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages