मुंबई महापौरपदी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रितू तावडे, भाजपवर टीकेची झोड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 February 2026

मुंबई महापौरपदी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रितू तावडे, भाजपवर टीकेची झोड


मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाने अनुभवी नगरसेविका रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, या निर्णयावरून राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला असून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. रितू तावडे या मूळ काँग्रेसच्या पदाधिकारी होत्या. बाहेरून आलेल्या नगरसेविकेची महापौर पदावर वर्णी लावल्याने पक्षातील एकनिष्ठ नगरसेवकांना डावलण्यात आल्याची टीका केली जात आहे. 

महायुतीकडून महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडे, तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम यांनी ही अधिकृत घोषणा केली. येत्या ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवडणूक होणार असून संख्याबळाचा विचार करता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नेत्या महापौरपदी - 
रितू तावडे या मूळच्या काँग्रेस पक्षातील नेत्या आहेत. काँग्रेसमध्ये असताना घाटकोपर विधानसभा महिला विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. २०१२ मध्ये कृपाशंकर सिंह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना महापालिका निवडणुकीसाठी तावडे यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. २०१२ च्या निवडणुकीत विजय मिळताच त्यांच्यावर भाजपने शिक्षण समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत त्या पराभूत झाल्या होत्या. मात्र, २०२६ च्या निवडणुकीत घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक १३२ मधून त्या पुन्हा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. भाजपकडून त्यांचे नाव महापौरपदासाठी जाहीर करण्यात आले आहे. 

भाजप कार्यकर्त्यांचा अपमान – क्लाईड क्रास्टो 
दरम्यान, भाजपच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी तीव्र टीका केली आहे. “मुंबईत भाजपसाठी रक्त, घाम आणि अश्रू वाहणाऱ्या निष्ठावान व अनुभवी भाजप नगरसेवकांचा हा थेट अपमान आहे. पक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ज्येष्ठ नगरसेविकांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या नेत्या महापौरपदासाठी निवडणे हा भाजपचा अंतर्गत विरोधाभास दाखवतो,” असा आरोप त्यांनी केला.

भाजप सत्ता आणि पदांसाठी तत्वांशी तडजोड करत असल्याचा आरोप करत, यामुळे पक्षातील जुने कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. सोशल मीडियावरही भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष व्यक्त होत असल्याचे चित्र दिसत आहे.

‘महापौर नव्हे, मुंबईची सेवक’ – रितू तावडे 
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना रितू तावडे म्हणाल्या, “मी स्वतःला महापौर म्हणून नव्हे, तर मुंबईची सेवक म्हणून पाहते. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. वरिष्ठांचा निर्णय सर्वांना मान्य असतो. हा माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे.”

एकीकडे महायुतीचा बिनविरोध विजय निश्चित मानला जात असला, तरी दुसरीकडे भाजपातील अंतर्गत नाराजी आणि विरोधकांचा आक्रमक पवित्रा यामुळे मुंबई महापालिकेच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटल्याचे स्पष्ट दिसत आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS